लखनऊ: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका तरुणीने प्रियकरासाठी आधी स्वतःचं घर आणि दुकान लुटलं. त्यानंतर तिने आई-वडिलांना नशा येणार सरबत पाजला आणि तेथून पळ काढला. शुद्धीवर आल्यानंतर पालकांनी आपल्या मुलीचा शोध सुरू केला. मात्र ती घरी न आढळल्याने त्यांनी पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर ते म्हणाले की, सर, मुलगी ज्या मुलासोबत पळून गेली आहे तो फ्रॉड आहे. तो तिचा धर्म बदलू शकतो. सध्या पोलीस तरुणीचा शोध घेण्यात व्यस्त आहेत.
वशिष्ठपुरम येथील रहिवासी असलेल्या एका सराफाचे ६० फुटी रोडवर दुकान आहे. काही दिवसांपासून त्यांच्या दुकानातून दागिने गायब होत होते. संशय आल्यावर सराफाने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये स्वतःची मुलगी दागिने घेताना दिसली. फुटेजच्या आधारे ते घरी पोहोचले आणि मुलीची चौकशी करू लागले. यावेळी मुलीने तिच्या वडिलांना अंकित सिंह भदौरियाबद्दल सांगितले. अंकितच्या सांगण्यावरूनच तिने दागिने चोरल्याचे सांगितले.
पीडितेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, आम्ही काही करू शकण्यापूर्वी त्याच रात्री म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 च्या सुमारास आमच्या मुलीने शरबत तयार करून आणला. जे प्यायल्यानंतर मी आणि माझी पत्नी बेशुद्ध झालो. रात्री उशिरा शुद्धीवर आलो, तेव्हा आमची मुलगी घरी नव्हती. घराचा दरवाजाही बंद होता. ओळखीच्या लोकांच्या मदतीने आम्ही दार उघडले. दुसऱ्या दिवशी दुकानात पोहोचल्यावर पाच लाख रुपयांचे दागिने, लॅपटॉप, हिऱ्याचे दागिने, चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसून आले.
‘मुलीचे धर्मांतर होण्याची भीती’
सराफाच्या मते, अंकित कुमार भदौरिया यांचे खरे नाव राजबाबू आहे. तो दुसऱ्या धर्माचा आहे. राजबाबू आपली ओळख बदलून आमच्या मुलीला भेटला. यानंतर तिला दुकानातील दागिने चोरण्यास प्रवृत्त करण्यात आले. मग त्याने आमच्या मुलीला फूस लावत पळवून नेले. आता आम्हाला एकच भीती आहे की, तो आमच्या मुलीचे धर्मांतर करून घेईल. पोलीस निरीक्षक जानकीपुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तरुणी आणि तिच्या प्रियकराच्या ठिकाणाचा तपास करत आहेत.