लोणी काळभोर : भरधाव वेगाने चाललेल्या दुचाकी ने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका चार चाकी गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी महाविद्यालयात शनिवारी (ता.२५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, विशाल दिलीप बहिरट (वय-३७, रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली जि. पुणे) यांची मुले लोणी काळभोर येथील एमआयटी शाळेत शिक्षण घेत आहेत. बहिरट हे नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी चालले होते. एमआयटी महाविद्यालयातून जात असताना त्यांच्या चारचाकी गाडीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने दुचाकीस्वाराला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र दुचाकीस्वाराचे अद्याप नाव समजू शकलेले नाही. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
महाविद्यालय परिसरात विद्यार्थी दुचाकीवर सुसाट
लोणी काळभोर परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत, या संस्थांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी दुचाकीवर शाळा व महाविद्यालयांमध्ये जातात. शाळेत जात असताना विद्यार्थी भरदा वेगाने स्टंटबाजी करून गाड्या सुसाट चालवितात. त्यामुळे लोणी काळभोर परिसरात छोटे-मोठे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशा सुसाट गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?.. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.