अकोला : आज मंगळवारपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली असून पहाटेपासूनच या संपाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे.अकोला, अमरावती आणि अहमदनगर जिल्ह्यातून धावणाऱ्या एसटी बसेस या डेपोमध्ये उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी..
अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर आज मंगळवारी सकाळी 6 वाजेपासूनच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बसेस या डेपोमध्येच उभ्या आहेत. तसेच अमरावती डेपोमधील काही कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच संपाची हाक दिली आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस खोळंबल्या आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक आणि ग्रामीण भागातील सर्व एसटी डेपो आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आले असून एसटी कर्मचाऱ्यांनी डेपोबाहेरच आंदोलन सुरू केलं आहे.
आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या बंदमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एसटी बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी निर्माण झाली असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. शिर्डी तसेच संगमनेर डेपोतून धावणाऱ्या बसेस स्थानकावरच उभ्या आहेत.
..तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही
प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सरकार जोरपर्यंत आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातही या संपाला प्रतिसाद मिळायला लागला आहे. त्यामुळे लालपरीची चाके थांबण्याची शक्यता आहे. आता ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता दिसत आहे.