पुणे : अनेकदा महिलांना काही गरजांसाठी नवऱ्याकडे किंवा मुलांकडून पैसे मागण्यात संकोच वाटतो. बरेच पती पत्नीच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष करतात, अशावेळी महिलांची फारचं कुचंबणा होते.
पण महिलांनी आपल्या आर्थिक व्यवहाराकडे जरा बदल केला, तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात. यासाठी बचत अर्थात सेव्हिंग फार महत्वाची आहे.
पैसे सेव्हिंग करण्यासाठी सहा सोप्प्या टिप्स जाणून घ्या.
अनावश्यक खर्च टाळा
गजर नसताना उगाच भारंभार खरेदी, डिस्काउंट आणि ऑफर्सच्या मोहात पडू नका. अशा खरेदीपासून स्वत:ला दूर ठेवा. कारण कुठलीही व्यवहारीक स्त्री आवश्यक गोष्टींना प्राधान्य देत अनावश्यक खर्च टाळते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती आपल्या खर्चाच्या व्यवस्थापनेवर ठरते. म्हणून गरजं असलेल्या वस्तूचं खरेदी करा आणि जमेल तितकी बचत करा, अनावश्यक खर्चाच्या मोहात पडू नका.
डिस्काऊंट्स, ऑफर्सचा योग्य वापर करा
पैसे वाचवणे म्हणजे आपलं मनं मारून जगणं नाही. तुम्हाला आवश्यक किंवा आवडलेली वस्तू खरेदी करण्यासाठी डिस्काऊंट्स आणि ऑफर्सचा योग्य वापर करा. तुम्हाला हवी असलेली उत्तम क्वालिटीची वस्तू सेलच्या काळात खरेदी करणे उत्तम पर्याय आहे. सणांच्या काळात भरपूर ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑफर्स, डिस्काऊंट्स असतात. अशावेळी ऑनलाइन ऑर्डर देण्यापूर्वी तुमच्याकडे कोणते कूपन कोड आणि व्हाउचर असतील तर त्याचा वापर करा.
बजेटनुसार करा खर्च
आपली आर्थिक स्थिती सुव्यवस्थित करण्यासाठी बजेट तयार करणे आणि त्याप्रमाणे खर्च करणे गरजेचे आहे. अनेक सेव्हिंग करणारे लोकं आपले उत्पन्न बघून त्याप्रमाणे महिन्याचे बजेट ठरवतात, ते बजेटच्या बाहेर जाऊन कधीही खर्च करत नाहीत. यापैकी एक म्हणजे खर्चाची डायरी ठेवत त्यात नोंद करा किंवा खर्चाच्या नोंदीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन्सचा वापर करा. प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा म्हणजे खर्च बजेटच्या बाहेर जाणार नाही याची तुम्ही काळजी घेऊ शकाल.
इर्मजन्सीसाठी काही पैसे राखून ठेवा
अनेकदा इर्मजन्सीवेळी आपल्याकडे पैसे नसतात, अशावेळी एफडी, सोनं किंवा लपवून ठेवलेले पैसे कामी येतात. त्यामुळे महिन्याच्या पगारातून थोडे पैसे बाजूला काढून ठेवा, तसे नसेल जमत तर सोन्यात गुंतवणूक करा, नाही तर जमा केलेल्या रक्कमेचे बँकेत एफडी तयार करा. हे पैसे इर्मजन्सीसाठी कामी येऊ शकतात.आर्थिक तज्ज्ञांच्या मते तुमच्याकडील इर्मजन्सी रक्कम ही महिन्याच्या उत्पन्नापेक्षा किमान 6 पट असावी.
उत्पन्नासाठी शोधा नवे मार्ग
व्यवहारिक महिला त्यांच्या नियमित उत्पन्नाव्यतिरिक्त उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. यात मोठे घर बांधून ते भाड्याने देणे, फावल्या वेळेत फ्रिलान्सिंग जॉब करणे, अतिरिक्त पैशांसाठी शिकवणी घेणे. जसे की तुम्हाला डान्सची आवड असेल आणि तुम्ही छान डान्स करत असाल तर डान्स क्लास सुरु करू शकता. चांगले रिटर्न्स मिळतील अशा ठिकाणी गुंतवणूक करणे यामुळे तुमचे महिन्याचे उत्पन्न वाढू शकते.
आधी बचत मग खर्च हा नियम पाळा
अनेकदा महिना संपेपर्यंत आपल्या हातात एक रुपया राहत नाही. पण तुम्ही पैसे बचतीबाबत गंभीर असाल तर तुम्ही बजेटमधील रक्कम महिन्याच्या सुरुवातीला बाजूला काढून ठेवा. बजेट आखताना 50/20/30 या नियमाचे पालन करा. म्हणजे तुमच्या उत्पन्नातील 50 % भाग हा आवश्यक गरजांसाठी म्हणजे किराणामाल, भाडे, बिलं यासाठी खर्च करा. 30 % भाग तुमच्या इतर आवश्यक गरजांसाठी राखून ठेवा, तर 20 % भाग बचत आणि गुंतवणूकीसाठी बाजूला ठेवा.यातील 20 % भाग बाजूला करून ठेवणे महत्त्वाचे आहे.