लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ काळभैरवनाथाचा कालाष्टमी जन्मोत्सव सोहळा अंबरनाथ मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध धर्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथाचे मंदिर सजविण्यात आले होते. बुधवारी (ता. १६) पहाटे ५ वाजता श्रीमंत अंबरनाथ व माता जोगेश्वरीला भाविकांच्या उपस्थितीत महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ ते ९ या दरम्यान १०१ दांपत्याच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक व होम हवन पार पडले. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान सिताराम भजनी मंडळाच्या वतीने श्री तुलसीदास रामायणाचे पठण होणार असून राजस्थानी सत्संग भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. तसेच श्रीमंत अंबरनाथ भजनी मंडळ यांचे ही भजन झाले.
दुपारी १२ वाजता सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता मंदिरात हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला. रात्री दहा वाजता हभप दत्ता महाराज काळभोर यांचे जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन झाले. मध्यरात्री बारा वाजता श्रीमंत अंबरनाथाचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंदिरावर विद्युत रोषनाई व परिसरात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.
गुरुवारी (ता. १७) सकाळी ९ ते १२ या काळात श्रींची पारंपारिक शाही मिरवणूक ढोल, ताशे व बॅन्डच्या सुमधूर आवाजात गावातून काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने महिला व तरूणीने मंगलकलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. दुपारी १२ ते ४ या वेळेत रामेश्वर सारडा व राजू चौधरी यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, दिवसभर मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन लोणी काळभोर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट व श्रीमंत अंबरनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येणार आले होते अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर यांनी दिली.