न्हावरे: हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि ग्रामदैवतावरील श्रद्धेचे प्रतीक असलेल्या न्हावरे (ता.शिरूर) येथील ग्रामदैवत क्षेत्रपाल श्री.भैरवनाथ महाराज आणि पीर चांदशाहवली बाबा यांचा पारंपरिक यात्रा उत्सव शनिवार (दि.21) ते सोमवार (दि.23) या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या यात्रेनिमित्त धार्मिक विधी, भव्य छबिना, संदल मिरवणूक, जंगी कुस्त्यांचा आखाडा, लोकनाट्य तमाशा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविक व ग्रामस्थांना अनुभवायला मिळणार आहे.

यात्रेची सुरुवात शनिवारी (दि.21) सकाळी ग्रामदैवत क्षेत्रपाल श्री. भैरवनाथ महाराज यांच्या महाभिषेकाने व विधिवत पूजेने होणार आहे. सायंकाळी शेरणी वाटप आणि दंडवताचा धार्मिक कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर रात्री नऊ वाजता ढोल-ताशांच्या गजरात श्री. भैरवनाथ महाराजांचा भव्य छबिना आणि पीर चांदशाहवली बाबांचा संदल मिरवणूक सोहळा संयुक्तपणे पार पडणार आहे. यावेळी आकर्षक शोभेचे दारूकाम आणि फटाक्यांची आतषबाजी हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
रविवारी (दि.22) सकाळी प्रसिद्ध तमाशा कलावंत आणि पद्मश्री रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांच्या तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन वाजता भव्य निकाली जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांना अस्सल ग्रामीण महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे. रात्री पुन्हा रघुवीर खेडकर व कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगणार आहे.

सोमवारी (दि.23) महिलांसाठी पारंपरिक शिळ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर कोल्हापूर येथील ‘धमाका ऑर्केस्ट्रा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत अनुभवता येणार आहे. यात्रेनिमित्त गावातील ग्रामदैवत परिसरासह संपूर्ण व्यापारी बाजारपेठ आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेतून धार्मिक श्रद्धेबरोबरच न्हावरे गावची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि ग्रामीण लोककलेचा वारसा जपला जाणार आहे.
या यात्रा उत्सवासाठी यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, परिसरातील भाविक, ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी आणि कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.







