नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदार आणि पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नोकरी सोडल्यानंतर संपूर्ण पीएफची रक्कम काढण्यासाठी आता 12 महिने थांबण्याची अट कमी करून पुन्हा 2 महिने करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी सोडलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी पीएफमधील पैसे मिळवणे अधिक सोपे होणार आहे.

यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये संपूर्ण पीएफ काढण्यासाठीची प्रतीक्षा मर्यादा 2 महिन्यांवरून 12 महिने करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय विश्वस्त मंडळाने पुन्हा जुना नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पीएफ खात्यात अनिवार्यपणे शिल्लक ठेवावी लागणारी रक्कम 25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. परिणामी, पात्र खातेदारांना त्यांच्या पीएफमधील 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
निवृत्तीनंतर पीएफची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी टप्प्याटप्प्याने मिळवण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. यासाठी ‘सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ (SWP) मंजूर करण्यात आला आहे. या सुविधेनुसार निवृत्त कर्मचारी मासिक, तिमाही किंवा सहामाही पद्धतीने पैसे काढू शकतील. उर्वरित रक्कम पीएफ खात्यात राहणार असल्याने त्यावर नियमानुसार व्याज मिळत राहील.

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर रोजी EPFO च्या 240 व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यामध्ये हे निर्णय घेण्यात आले. मात्र, अंतिम पेन्शन रक्कम काढण्यासाठीची किमान 36 महिन्यांची प्रतीक्षा मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. या बदलांमुळे नोकरी सोडणाऱ्या तसेच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजनासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.







