पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता थेट वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून पुण्यातील एका महिला डॉक्टरची तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. २२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी ४३ वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पुणे सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात फिर्यादी महिला डॉक्टरच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने आपण ‘सायबर सेल ऑफ इंडिया’मधून चौधरी बोलत असून, विश्वास नांगरे पाटील यांचा सहाय्यक असल्याचे सांगितले.

त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या एका क्रमांकावरून फोन आला. या व्यक्तीने आपण मुंबई क्राइम ब्रँचचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर महिला डॉक्टरला विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवण्यात आली.
महिला डॉक्टरचे आधार कार्ड एका संशयास्पद मोबाईल क्रमांकाशी लिंक असल्याचे चोरट्यांनी सांगितले. तसेच, त्या क्रमांकावरून अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवून पैसे कमावले जात असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय, महिला डॉक्टरचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात आल्याचे सांगून तिला घाबरवण्यात आले.
अटक टाळायची असेल, तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. या धमकीमुळे घाबरलेल्या महिला डॉक्टरने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर तीन लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.







