पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अजितदादांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या VSR कंपनीला निर्दोष ठरवण्यासाठी सध्या मोठी घाई सुरू आहे. ट्रोलर्सच्या टोळीपासून ते अनेक मंत्री आणि आमदारांपर्यंत सर्वजण या कंपनीची बाजू घेत आहेत. एका खासगी कंपनीचा बचाव करण्यापेक्षा अजितदादांना न्याय देण्यासाठी हा प्रयत्न केला असता, तर राज्याला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटला असता.

दुसरीकडे, या प्रकरणात राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोप चांगलेच वाढले आहेत. रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे VSR कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांचा एक फोटोही सादर केला होता आणि मफलर मॅन कोण आहे, याबाबतही माहिती दिली होती. त्यांच्या या थेट हल्ल्यामुळे भाजप नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यापासून अंतर राखत ही रोहित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे, पक्षाची अधिकृत भूमिका नाही.
संपूर्ण सरकारी यंत्रणा एका कंपनीच्या रक्षणासाठी झटत असेल, तर त्या कंपनीशी संबंधितांचे नेमके काय हितसंबंध आहेत, हे लपून राहिलेले नाही, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. या कंपनीची बाजू घेताना एका मंत्र्याने रोहित पवार यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना रोहित पवार यांनी आजच नार्को टेस्ट करण्याचे थेट आव्हान दिले आहे.

मात्र, आपल्यासोबत संबंधित व्यक्तींचीही नार्को टेस्ट केल्यास खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे. मी तपासाला कधीही तयार आहे, पण सत्य बाहेर येईल या भीतीने ते या कसोटीला सामोरे जातील का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.






