पुणे: यंदा २०२६ मध्ये तुळशी विवाहाचा मुख्य दिवस शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी आहे. काही ठिकाणी कार्तिकी एकादशी म्हणजेच २० नोव्हेंबरच्या संध्याकाळीही तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा आहे. पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी सुरू होऊन २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांपर्यंत राहणार आहे. उदयतिथीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:५९ ते ६:२५ हा गोकुळी मुहूर्त तुळशी विवाहासाठी शुभ मानला जातो.

धार्मिक श्रद्धेनुसार, आषाढी एकादशीपासून योगनिद्रेत असलेले भगवान विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होतात. त्यानंतर माता तुळशी आणि भगवान विष्णू यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. हा सोहळा तुळशी विवाह म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात या उत्सवाला विशेष महत्त्व असून, घराघरांत भक्तिभावाने तुळशी विवाह साजरा केला जातो.
तुळशी विवाहानंतर लग्नसराई आणि इतर शुभकार्यांना सुरुवात होते, अशी धार्मिक मान्यता आहे. घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदावी, या श्रद्धेने भाविक हा सोहळा साजरा करतात. त्यामुळे कार्तिक महिन्यातील तुळशी विवाहाची भाविकांकडून दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा केली जाते.

.






