शिरूर : शेतात कष्ट करणाऱ्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. गुरूवारी (ता. 14) हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, सणासाठी लागणारे विविध साहित्यांची दुकाने देखील सजलेली पाहावयास मिळत आहेत. यावर्षी रखडलेला पाऊस त्यातून या साहित्यांची 20 ते 30 टक्के दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेला पोळा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने पिकांची स्थिती चांगली नाही. जोडीला महागाईने तोंड वर काढले आहे. शेतातील कांदा, टोमॅटोला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही. महागाई असली तरी बळीराजा सर्जा राजाला सजविल्याशिवाय राहत नाही. साहित्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बाजारपेठांमध्ये बैलपोळ्याच्या खरेदीसाठी गर्दी कमी झाली नाही. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. जिव्हाळ्याचा व पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेल्या या सणावर यंदा महागाईचे सावट आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्यामुळे बैलाच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. पोळा साहित्याची दुकाने ग्रामीण भागात सजली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात साहित्याची अधिकच्या दरात खरेदी करावी लागत असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.
दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा पर्याय निवडला आहे. पोळ्यासाठी मातीचे बैल विक्री करणारे व्यावसायिक विविध रंगी बैलजोड्या घेऊन बाजारात दाखल झाले आहे. वर्षभर राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य बाजारात दिसू लागली आहेत.