संदीप जगताप
जिंती : वडीलांसोबत आठवड्याचा बाजार करण्यासाठी दुचाकीवरून चाललेल्या एका महिलेची पर्स गहाळ झाल्याची घटना घडली होती. ही घटना जिंती (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील चौफुला येथे बुधवारी (ता. 30) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. योगायोगाने ही पर्स जिंती येथील एका तरुणाला रस्त्यावर सापडली. या तरुणाने प्रामाणिकपणा दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली पर्स हरवलेल्या व्यक्तीला परत केली. त्यामुळे या तरुणाच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक होत आहे.
गजानन मारुती पोटे असे पर्स परत करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. संबंधित महिलेची पर्स पोटे यांनी शहाजी जाधव यांना परत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी जाधव हे टाकळी (रा.) येथे कुटुंबासोबत राहतात. जिंती येथील आठवडे बाजार करण्यासाठी ते आणि त्यांची मुलगी दुचाकीवरून चालले होते. तेव्हा टाकळी करमाळा रस्त्यावरून जात असताना, मुलीकडून जिंती चौफुला परिसरात पर्स गहाळ झाली होती. त्यानंतर त्यांनी पर्स ची शोधाशोध घेतली मात्र त्यांना पर्स मिळून आली नाही. या घटनेमुळे ते बाजार न करताच घरी परतले.
दरम्यान, जिंती येथील तरुण गजानन पोटे हे शेतातील मोटार चालू करण्यासाठी भीमानदीकडे बुधवारी (ता.30) पावणे सहा वाजण्याच्या सुमारास चालला होता. दुचाकीवरून जात असताना, त्यांना चौफुला परिसरात रस्त्याच्या एका बाजूला पर्स दिसली. त्यांनी पर्स उचलून पाहिल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र व काही रक्कम आढळून आली. त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून पर्स मालकाचा शोधाशोध सुरु केली. परंतु, संबंधित पर्स मालक मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी ज्याची कोणाची पर्स हरवली असेल त्याने ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन केले. आणि तसा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल केला.
या बाबतची माहिती मिळताच, शहाजी जाधव हे दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.१) गजानन पोटे यांच्या घरी आले. त्यांनी पर्सची माहिती, त्यामधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम याची माहिती सांगून ओळख पटवून दिली. खात्री पटल्यानंतर गजानन पोटे यांनी शहाजी जाधव यांना पर्स परत केली. जगात प्रामाणिकपणा कुठे आहे, असे सहज बोललं जात, पण प्रामाणिकपणा आहे. हेच जिंतीचे सुपुत्र गजानन पोटे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.