सागर जगदाळे
भिगवण : यंदाचा ऊस गाळप हंगाम चालू झाल्यामुळे ऊस कारखान्यांसाठी पर जिल्ह्यातून आलेले ऊस तोड कामगार यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषद पुणे व तक्रारवाडी उपकेंद्र यांच्या सहाय्याने रोटरी क्लब भिगवण तर्फे ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी रोटरी क्लब भिगवणचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, सेक्रेटरी वैशाली बोगावत, तक्रारवाडी उपकेंद्रच्या डॉ. मृदुला जगताप, सचिन बोगावत, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खाडे, औदुंबर हुलगे, मराठी पत्रकार संघ भिगवणचे अध्यक्ष तुषार क्षिरसागर, भिगवण ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी जावेद शेख तसेच अमोल वाघ इत्यादी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब भिगवण चे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की सध्या ऊसतोड कामगारांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. दिवसभरच्या ऊस तोडीमुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबातील लहान मुले,वयस्कर माणसे व महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही.याचीच दखल घेऊन ऊसतोड कामगारांच्या फडा वर जाऊन आम्ही त्यांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले.यामध्ये त्यांचे बीपी,शुगर चेक करून त्यांना योग्य तो सल्ला देऊन त्यावरील औषधे मोफत त्यांना दिली.
तक्रारवाडी उपकेंद्राच्या डॉ.मृदुला जगताप म्हणाल्या की आता जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी मोहीम चालू आहे. तक्रारवाडी व परिसरातील महिलांमधील सर्व आजारांची तपासणी करून तसेच गर्भवती मातांची व लहान मुलांची तपासणी करून त्यांना समुपदेशन करून हिमोग्लोबिन, रक्तगट तपासून औषधोपचार केले.यामध्ये लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले.तसेच येथील गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी खानावरे हॉस्पिटल तर्फे करून देण्याचे ठरविण्यात आले आहे.
ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्या निवारणाच्या सातत्य हवे
नशिबी आलेले आदीच ‛अठरा विश्व दारिद्र्य’,पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हा तान्हात करावी लागणारी ऊसतोड त्यासाठी आज या बांधावर तर उद्या दुसऱ्या बांधावर.या धावपळीत स्वतः च्या व मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. असे एक ना अनेक ऊसतोड मजुरांचे प्रश्न आहेत. पण ‘अर्धा कोयता’ या उल्लेखाने ओळखल्या जाणाऱ्या ऊसतोड करणाऱ्या महिला मजुरांचे आरोग्याचे प्रश्न वेगळे व गंभीर आणि गुंतागुंतीचे आहेत. ऊसतोड मजुरांचे आरोग्याचे प्रश्न सोडविताना या महिलांच्या समस्यांकडे स्वतंत्रपणे आणि अधिक सहानुभूतीने पाहावे लागेल. त्या दृष्टीने काही पावले आता पडत आहेत आणि ती सातत्यपूर्ण राहावी अशी अपेक्षा व्यक्त ऊसतोड कामगारांकडून होत आहे.