लहू चव्हाण
पांचगणी : खांबील पोकळे (ता. महाबळेश्वर) परिसरात रानगवे व इतर वन्य प्राण्यांनी भात पिकात हैदोस घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
भात शेतात रांनगव्यांच्या कळपाने अक्षरशः थैमान घातले आणि लागण केलेल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात आज नुकसान केले आहे. गंगाराम पांडुरंग जाधव, तानाबाई महादेव जाधव, लक्ष्मण धोंडीबा जाधव, मारुती हरिभाऊ शिंदे,संपत किसन शिंदे, सर्जेराव नामदेव कदम, राजाराम आत्माराम कदम, विशाल विठ्ठल जाधव असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे आहेत.
सध्या पावसाच्या अनिश्चिततेने आणि वातावरणातील बदलामुळे शेतकरी चिंतेत असताना असताना या वन्य प्राण्यांच्या संकटाने शेतकरी राजा अक्षरशः हतबल झाला आहे.
प्रचंड महागाईने शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. महागाईची बियाणी खरेदी करून शेतकऱ्यांनी त्यातून आर्थिक उत्पन्नाची आशा ठेवली होती. त्यातच या वन्य प्राण्यांच्या संकटाने भात उत्पादकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे.
पावसाच्या भरवशावर दरवर्षी या विभागात शेतकरी भात पिकाला महत्त्व देवून पीक घेत असतात जेणेकरून वर्षभराची रोजीरोटी निर्माण होते. यावर्षी पाऊस जास्त असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी भात रोपे लावून लागण ही केली आहे. पण रानटी प्राण्यांच्या या आस्मानी संकटाने पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.
या आठही शेतकऱ्यांच्या भात शेतात रान गव्यानी हैदोस घालून रोपेही खाल्ली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान या शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वन्य प्राण्यांनी केलेले नुकसान न भरून येण्यासारखे आहे.
दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात वन्य प्राणी रात्रीच्या वेळी उभी पिके फस्त करीत असून कळप च्या कळप या पिकांमध्ये रात्रीच्या वेळी हैदोस घालताना दिसत आहेत. त्यामुळे वन विभागाने या प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या शेतकऱ्याला नुकसानीची भरपाई मिळावी अशीही मागणी होताना दिसत आहे. जर या प्राण्यांचा लवकर बंदोबस्त केला नाही तर उद्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते.