लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील हॉटेल ‘ग्रॅंड विक्टोरिया द फर्न’च्या दारात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने आज दुपारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी हाॅटेलच्या दारात पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर बसून हॉटेल मालक व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वाहतूकीला अडथळा होऊ नये, त्याचबरोबर आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी आंदोलनस्थळी येत हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम येत्या दहा दिवसांत काढून टाकणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर पुढील काळासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात ‘आरपीआय’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील (भाई) गायकवाड, सरचिटणीस अप्पासाहेब गायकवाड, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकाळजे, ‘आरपीआय’चे तालुका अध्यक्ष जाॅन जोसेफ, कार्याध्यक्ष अतिश उर्फ पप्पू भोसले, शहराध्यक्ष साजिद क्षिरसागर, महाबळेश्वरचे शहराध्यक्ष विनय गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.