पुणे : राज्य सरकारने पुणे महापालिकेला शहरातील 323 रस्त्यांची रुंदी सहा मीटरवरुन 9 मीटर करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा, असे आदेश दिले आहेत. यामुळे या रस्त्यांवर परवानगी देण्यात आलेल्या बांधकामांचे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुणे शहरातील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांलगतच्या बांधकामासाठी टीडीआर वापरण्यास २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाई केली होती. त्याऐवजी युडीसीपीआरमध्ये तरतूद करून सहा मीटरच्या रस्त्यावर पुनर्विकासासाठी आवश्यक असणारा एफएसआय वापरण्यास त्यांनी परवानगी दिली होती. परंतु, महापालिकेने या रस्त्यांचे रुंदीकरण सहा मीटरवरुन नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. राज्य सरकारने हा प्रस्तावच रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवावा असे आदेश महापालिकेला दिले आहेत, अशी माहिती ‘आपले पुणे’ या संस्थेचे उज्ज्वल केसकर यांनी दिली आहे. यावर आता महापालिका काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण केले तर अनेक अडचणी निर्माण होतील असा दावा ‘आपले पुणे’ या संस्थेचे उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी यांनी घेत रुंदीकरणाला विरोध केला होता. तसेच मुळात या विषयाचा ठराव कलम 210 प्रमाणे झालेला नाही, हा ठरावच मुळात बेकायदेशीर आहे, असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महापालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.