बारामती : कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली लपवून ठेवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार असा घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पूर्ववैमनस्यातून गंभीर हल्ल्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

योगेश उर्फ धन्या कांबळे, आदेश कुचेकर, ऋषिकेश उर्फ पप्पू चंदनशिवे आणि अभिजीत शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई गिरीश नेवसे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशिट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील शिवाजीनगर गणेश मंदिराशेजारील कुस्तीच्या तालमीत शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांना 31 ऑक्टोबर रोजी मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तालमीत शोधमोहीम राबवली. यावेळी लाल मातीमध्ये लपवलेले चार लोखंडी कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली.

या चारही आरोपींविरुद्ध यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, मारहाण आणि धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही प्रकरणांमध्ये मोक्का कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेली शस्त्रे कोठून आणली, ती तालमीत कोणी लपवली, कोणावर हल्ल्याचे नियोजन होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत







