राहुलकुमार अवचट
यवत – उंडवडी ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याने आज रविवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा फडशा पाडला आहे. या घटनेमुळे उंडवडी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
उंडवडी परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असुन गेल्या दोन दिवसापूर्वी बिबट्याने रमेश वराळे यांच्या घरापुढे बांधलेल्या दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. पुन्हा बिबट्याने आज रविवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास वराळे यांच्या शेळ्यांवर हल्ला चढविला. आणि या हल्ल्यात ३ शेळ्या मृत्यु पडल्या.. अशा एकूण पाच शेळ्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे. या हल्ल्यामुळे वराळे यांचे तब्बल ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनास्थळी वन विभागीय अधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी भेट देऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे.नागरिकांनी आपल्या गोठ्यांना बंदिस्त करून घ्यावे व रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी जाताना एकटे न जाण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले.यावेळी उंडवडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर गडदे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ दोरगे, सतीश जाधव, परशुराम गुंड, बाळासाहेब वराळे, स्वप्निल वराळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना उंडवडीच्या सरपंच दीपमाला जाधव म्हणाल्या की, परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्या असुन लोकवस्तीमध्ये शिरकाव करू लागला आहे. परिसरातील शेळी, मेंढी, गाई यांच्या वर बिबट्या हल्ले करत आहे. याचा वेळीच बंदोबस्त वन विभागाने करण्यासाठी या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली आहे.