पुणे : दि कॉसमॉस को-ऑप. बँक लिमिटेडने श्री शारदा सहकारी बँकेचे विलीनीकरण करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२१ मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरण बाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विलिनीकरण होणारे भारतातले सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे.
आत्तापर्यंत या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेने एकूण 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.श्री शारदा सहकारी बँक लिमिटेड पुणेचे द कॉसमॉस को – ऑप. बँकेमध्ये विलीनीकरण करण्यात आल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.
उपाध्यक्ष सचिन आपटे म्हणाले, “या विलीनीकरणाचे वैशिष्ट्य हे आहे की, हे दोन सक्षम बँकांचे विलीनीकरण आहे. जसे राष्ट्रीयकृत बँकांच्या विलीनीकरणामुळे होणाऱ्या त्यांच्या समन्वयाचे फायदे उठवण्याकरिता, ग्राहकसेवा वाढण्याकरिता आणि बँकांची क्षमता वाढण्याकरिता म्हणून भारत सरकारने राष्ट्रीयकृत बँकांची विलीनीकरणे केली. त्याचप्रमाणे अर्बन को-ऑप. बँकांचीसुद्धा अशी विलीनीकरणे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित होती. त्याप्रमाणे परिपत्रक आल्यानंतर ऑक्टोबर 2021 मध्ये मध्ये या दोन्ही बँकांनी विलीनीकरणाबाबत सकारात्मक विचार करुन सदर परिपत्रकानुसार हा विलिनीकरण प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे दाखल केला होता,”
या प्रसंगी कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे, उपाध्यक्ष सचिन आपटे, ज्येष्ठ संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, ॲड. प्रल्हाद कोकरे, प्रा. नंदकुमार काकिर्डे, अनुराधा गडाळे, प्रा. राजेश्र्वरी धोत्रे आदी उपस्थित होते.
श्री शारदा सहकारी बँकेची व्यावसायिक उलाढाल जवळपास रू.550 कोटी असल्याची माहिती कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलिनीकरण बाबतचे परिपत्रक जारी केले. त्यानुसार विलीनीकरण होणारे भारतातले, सहकार क्षेत्रातले हे पहिलेच विलीनीकरण आहे.
विलीनीकरणानंतर कॉसमॉस बँकेमध्ये 8 शाखा, अंदाजे 50, 500 ग्राहक, रु.533 कोटींची व्यवसायाच्या सेट-अपमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कॉसमॉस बँकेच्या 152 शाखा झाल्या आहेत. पुणे शहरात आता कॉसमॉस सर्वात जास्त शाखा असणारी बँक झाली आहे. आत्तापर्यंत या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेने एकूण 16 बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे.
या विलीनीकरणामुळे शारदा बँकेच्या सर्व आठ शाखांमधून कॉसमॉस बँकेच्या नेट बँकींग, मोबाइल बँकींग, व्हॉटस्अॅप बँकिंग अशा सारख्या सर्व अत्याधुनिक सेवांचा लाभ सर्व खातेदारांना मिळावा या हेतूने श्री शारदा सहकारी बँकेने विलीनीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. कॉसमॉस बँकेच्या 7 राज्यात शाखा असून 28 हजार कोटींची उलाढाल आहे. या राज्यातील सर्व शाखांमधून विविध प्रकारचे बँकींग व्यवहार करण्याची सुविधा बँकेच्या सध्याच्या सर्व खातेदारांना मिळणार आहे.