पाचगणी, ता.२४ : शेतकरी, ग्राहक, व्यावसायिक, महिला यांना दिलेल्या कर्ज सुविधा जिल्ह्याच्या विकासातील योगदान आहे. सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली असल्याचे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले.
पाचगणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात पाचगणी विकास सेवा सोसायटी, जनसेवा सर्वोदय दूध उत्पादक सोसायटी व ह.भ.प. दतात्रय कंळबे महाराज पतसंस्था या तीन संस्थेच्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. सरकाळे बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रविण भिलारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे संचालक जतिन भिलारे, मुंबई बॅंकेचे संचालक आनंदराव गोळे, अरुण गोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र राजपुरे म्हणाले, ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक व नोकरदारांना डोळ्यासमोर ठेऊन बँकेच्या थेट ४७ कर्ज योजना त्याचबरोबर सोसायट्यांमार्फत राबविल्या जाणार्या ६८ कर्ज योजनांच्या व्याजदरात एक ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. बँकेचा मुख्य ग्राहक हा शेतकरी आहे. त्यांना सुलभ व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देऊन आर्थिक विकासाचे चक्र अधिक गतिमान करण्याचा मानस बँकेने डोळ्यासमोर ठेवला आहे’.
यावेळी पाचगणी विकास सेवा सोसायटीच्या सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. तीनही संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन विलास राजपुरे यांनी केले तर आभार जनसेवा सोसायटीचे चेअरमन जानू पांगारे यांनी मानले.