उरुळी कांचन, (पुणे) : मागील दोन वर्षापूर्वी उरुळी कांचन ते स्वारगेट पर्यंतची ”पीएमपीएमएल’ची बससेवा बंद पडली होती. त्यामुळे उरुळी कांचनसह परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षणासाठी जाण्यासाठी अडचणींना सामना करावा लागता होता. त्यामुळे उरुळी कांचन ते स्वारगेट बससेवा ही पूर्वरत सुरु व्हावी. अशी मागणी विद्यार्थी व प्रवासी संघटनेने केली होती. या मागणीचा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून उरुळी कांचन ते स्वारगेट ”पीएमपीएमएल” बस सेवा उद्या शुक्रवारपासून (ता.5) नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
उरुळी कांचन शहर हे पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे येथील कामगार वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने पुण्यात जातात. त्यामुळे नागरिकांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडे बससेवा सुरु करावी म्हणून मागणी केली होती. त्यानंतर ”पीएमपीएमएल” ने नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा सुरु केली होती. मात्र कोरोना काळात ही बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतरही बससेवा सुरु झालीच नाही.
पूर्व हवेलीतील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उरुळी कांचन शहराला ओळखळे जाते. दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील हजारो नागरिक उरुळी कांचन येथील बाजारपेठेत येतात. तसेच हवेली तालुक्यातील 20 गावातील व 50 वाड्या – वस्त्यावरील नागरिक खरेदीसाठी या बाजारपेठेला पसंदी देतात. या बाजारपेठेत फर्निचर, सोन्याची दुकाने, मोबाईलची दुकाने, तसेच दैनंदिन व्यवहार व नियमितपणे चाललेली भाजी, छोटे-मोठे उद्योगधंदे करणारे फळांचे व्यापारी व उद्योगधंदे करणार्या लोकांची दुकाने आहे. या सर्वांचा नियमितपणे पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, निगडी, मार्केटयार्ड, हिंजवडी आय टी पार्क आणि पुणे आणि परिसरासाठी येणे जाणे सुरूच असते.
उरुळी कांचन व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, कामगार व नोकरदार वर्गाला पुण्याला कामाला थेट बस नव्हती. त्यामुळे त्यांना हडपसर येथे उतरून दुसरी बस पकडावी लागत होती. त्यामुळे प्रवास्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वेळही वाया जात होता. त्यांची गैरसोय लक्षात घेता उरुळी कांचन प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य व यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन यांच्याकडे स्वारगेट (सारसबाग) ते उरुळी कांचन पर्यंत बससेवा सुरु करावी. यासाठी निवेदन दिली होते.
संतोष कांचन यांनी प्रवासी संघाची मागणी लक्षात घेऊन, कांचन यांनी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांची पुण्यातील विधान भवन कौन्सिल हॉलमध्ये भेट घेतली. व उरुळी कांचन ते स्वारगेटसह निगडी,वारजे,माळवाडी,भोसरी,हिंजवडी व कात्रज यादरम्यान बस सेवा सुरू करण्यात यावे. असे निवेदन दिले. या निवेदनाची अजित पवार यांनी त्वरित दखल घेतली व ”पीएमपीएमएल”च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांना बससेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर दीपा मुंडे यांनी उरुळी कांचन ते स्वारगेट पर्यंतच्या बससेवेला हिरवा कंदील दाखविला आहे.
संतोष कांचन यांनी केलेल्या पाठपुराव्याला आज अखेर यश आले असून, उद्या शुक्रवार पासून नागरिकांच्या सेवेसाठी बससेवा पुन्हा पूर्वरत होत आहे. याचा स्थानिक प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. आतापर्यंत प्रवाशांना हडपसर येथे बस बदलावी लागत होती, मात्र नव्या थेट बसमुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. त्यामुळे संतोष कांचन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, उरुळी कांचन या ठिकाणी एस. टी. महामंडळाचे बसस्टँड नसल्यामुळे पुण्याहून आणि मुंबई वरून सोलापूर, लातूर, बार्शी, गुलबर्गा, विजापूर, उस्मानाबाद वा मराठवाडा आणि कर्नाटक कडे जाणाऱ्या आणि परत मुंबई पुणे कडे परतणाऱ्या एस. टी बसेस थांबत नसल्याने प्रवाशी वर्गाची प्रचंड अडचण होत होती. हि अडचण उरुळी कांचन ते स्वारगेट थेट बससेवा सुरु झाल्याने दूर झाली आहे.