दीपक खिलारे
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर शहरात ‘शरद कृषी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे उपस्थित होते.
पुढे माहिती देताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा ‘शरद कृषी महोत्सव २०२२’ आठ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत इंदापूर शहरातील शंभर फुटी रोड, नवीन तहसील कचेरी शेजारी प्रांगणात होणार असून, यामध्ये शेतकरी महिला युवक यांच्यासाठी हा शरद कृषी महोत्सव वरदान ठरणारा असणार आहे.
यामध्ये राज्यस्तरीय कृषी महोत्सव असल्याने, तब्बल २०० प्रकारचे विविध स्टॉल या प्रदर्शनात असणार आहेत. महाराष्ट्रातील नामांकित महत्त्वाच्या कृषी कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत.
तालुक्यातील शेतकरी घेत असलेल्या विविध पिकाच्या वाढीसाठी, परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन या कृषी महोत्सवात केले जाणार आहे. यासाठी नामांकित वक्ते मान्यवर यांची उपस्थिती लागणार आहे.
याचबरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जे शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र होणार आहे. यामध्ये डाळिंब फळबाग विषयावर लिंबूवर्गीय फळबाग, व पेरू या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल.
दुग्ध व्यवसाय आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, शेळी मेंढी पालन व्यवस्थापन, फुले शेती, भाजीपाला, हरितगृह आधुनिक तंत्रज्ञान यावर देखील शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
तसेच प्रगतशील शेतकरी थेट शेतकऱ्यांची संवाद साधणार असल्याने आगामी काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाचा मोठा फायदा लागणार आहे, अशी ही माहिती गारटकर यांनी दिली.