दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरातील एच.डी.एफ.सी बँकेच्या खात्यात एका अज्ञात व्यक्तीने पाचशे रुपयांच्या २६ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १९) घडली आहे. त्यामुळे दौंडसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक अनुप संभाजी भोसले (वय – ३८, रा. ईश्वरीय हेरिटेज, दौंड ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास दौंड-पाटस रोडवरील हाँटेल राजधानी समोरील एचडीएफसी बँकेत बँकेचे खातेदार आश्विनी शहाजी कापसे यांचे पती शहाजी कापसे रा. देऊळगाव राजे (ता. दौंड) यांनी बँकेत रोख रक्कम २७ हजार रुपयांचा भरणा केला.
भरणा केल्यानंतर जमा केलेल्या पैशाचा संदेश आला नसल्याने कापसे यांनी बँक व्यवस्थापकांना विचारले. यावेळी व्यवस्थापकाने लागलीच डिपॉझिट भरण्यासाठी असलेली मशीन उघडून पाहिले असता कापसे यांनी भरणा केलेल्या रकमेपैकी २६ हजार ५०० रुपयांच्या नोटा (बनावट) असलेल्या दिसून आल्या. बनावट नोटा कापसे यांनी भरणा केलेल्या रुपयांपैकीच आहेत हे निष्पन्न झाले. त्यामुळे व्यवस्थापकाने या नकली नोटांबाबत कापसे यांना विचारले असता त्यांना ती रक्कम एका अज्ञाताने दिली असल्याचे कापसे यांनी व्यवस्थापकाला सांगितले.
दरम्यान, व्यवस्थापकाने दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने बँकेच्या खात्यामध्ये बनावट नोटांचा भरणा केल्याची तक्रार केली. दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.