पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशातच आता सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहिनी आकाश करनुरे (वय २१, रा. देवाची ऊरळी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी व आकाश यांचा गेल्या वर्षी (ऑगस्ट २०२४) विवाह झाला आहे. विवाहानंतर मोहिनी ही पती व सासू-सासऱ्यांसोबत देवाची ऊरळी येथील ओसवाल मळा येथे राहत होती. दरम्यान सासरच्यांकडून तिला माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. वारंवार तिला टोचून बोलून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असे. या त्रासाला कंटाळून अखेर तिने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.तिच्यावर अत्यंसंस्कार केल्यानंतर मोहिनी हिचे वडिल ज्ञानेश्वर माशाळे (वय ४६, रा. उमरगा, जि. धाराशिव) यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यानंतर गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी पती आकाश विलास करनुरे, सासरे विलास नारायण करनुरे व सासू शोभा विलास करनुरे यांना अटक केली आहे.