उरुळी कांचन, (पुणे) : वीजबिल थकल्याने यवत परिसरातील शेतकऱ्यांचा विजपुरवठा बंद केल्याने, चिडलेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी यवत सब स्टेशन वरुन उरुळी कांचनला येणारा विजपुरवठा मागील सहा तासापासून बंद केल्याने उरुळी कांचनसह परिसरातील ७ गावे अंधारात गेली आहेत.
यवत परिसरातील शेतकऱ्यांनी तुमची वीज नको आणि आमच्या शेतात वीजवितरणचे खांबहि नको अशी भूमिका घेतल्याने वीजवितरण कंपनीपुढे अभूतपूर्व प्रसंग उभा राहिला आहे. उरुळी कांचन, आष्टापूरसह ७ गावातील विजपुरवठा मागील सहा तासांपासून बंद असल्याने व्यवहार ठप्प आले आहेत. त्यामुळे उरुळी कांचन परिसरात वीजवितरण कंपनीविषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मागील तीन तासापासून वीजवितरण कंपनीचे अधिकारी, शेतकरी यांच्यात उरुळी कांचनचा विजपुरवठा सुरुळीत करण्याबाबतची चर्चा निष्फळ ठरली असून शेतकरी तुमची वीज नको व आमच्या शेतात तुमचे खांबहि नको या भूमिकेवर अडून बसले आहेत. याबाबतचा वाद यवत पोलीस ठाण्यात पोहोचलाअसून पोलिसांच्या भूमिकेकडे उरुळी कांचनसह परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
शेतीपंपाचे वीजबिल भरण्याच्या कारणावरून यवत व परिसरातील ७० हून अधिक रोहीत्रांचा विजपुरवठा वीजवितरण कंपनीने मागील दोन दिवसांपासून बंद केला आहे. यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यानी तुमची वीज नको व आमच्या शेतात तुमचे खांबहि नको अशी भूमिका घेतली असल्याने विजपुरवठा बंद केला आहे.