अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राहणार अजनी इथं घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने शेतकऱ्याने ट्रॅक्टर चोरीचा बनाव रचला. मात्र, हा बनाव त्याच्या अंगलटी आल्याच पहायला मिळत आहे. यशपाल खंडारे (३०) आणि विनायक खंडारे (६०) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
खंडारे यांनी वित्तपुरवठा कंपनीकडून कर्ज घेतले होते. कर्ज वसूलीसाठी वित्तपुरवठा कंपनीकडून तगादालावला जात होता.
त्यातून सुटका करून घेण्याच्या उद्देशाने शेतकरी पिता-पुत्राने स्वत:च्याच ट्रॅक्टर चोरीचा बनाव रचला. मात्र, पोलीस तपासात सत्य निष्पन्न झाले.
विनायक खंडारे यांनी गेल्या ३१ डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चोरी झाल्याची माहिती लोणी पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते.
वाशीम जिल्ह्यातील धनज येथे एका शेतात एक ट्रॅक्टर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रल्हाद उमाळे यांच्या शेतात असलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आणि ट्रॅक्टर चोरीची फिर्याद दाखल करणारे यशपाल आणि त्याचे वडील विनायक खंडारे या दोघांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले, तेव्हा त्यांनी स्वत:च ट्रॅक्टर लपवून ठेवल्याची कबुली दिली.
ट्रॅक्टरसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि कंपनीचे प्रतिनिधी हे घरी येऊन ट्रॅक्टर उचलून नेण्याची धमकी देत असल्याने ट्रॅक्टर स्वत:च नातेवाईकाच्या शेतात लपवून ठेवला होता, असे आरोपींनी सांगितले. ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल झाला की, वित्तपुरवठा कंपनी रक्कम मागणार नाही, असे गृहीत धरून या आरोपी पिता-पुत्राने बनाव रचला, पण पोलीस तपासातून तो उघड झाला.