उरुळी कांचन, (पुणे) : ‘आज रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तुमच्या घराचा वीजपुरवठा खंडित होणार आहे. तातडीने तुम्ही आमच्या इलेक्ट्रिसिटी ऑफिसच्या या नंबरवर संपर्क साधा’ असे बनावट मेसेज उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना येऊ लागले आहेत. त्यामुळे उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट ‘एसएमएस’ पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे. त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा ॲप डाऊनलोड करण्यास सांगणे, याला वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाल्याने उरुळी कांचन परिसरात बनावट मेसेज ची जोरदार चर्चा सुरु झाली असून सोशल मिडिया, व्हाटस अपच्या माध्यमातून एकमेकांना माहिती देण्याचे काम सध्या जोरदार सुरु झाले आहे.
याबाबत सोशल मिडियावर एक मेसेज फिरत आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे. प्रिय ग्राहक तुमची वीज खंडित केली जाईल. आज रात्री साडेआठ वाजता वीज कार्यालयातून दि. कारण तुमचे मागील महिन्याचे बिल अपडेट झाले नव्हते. कृपया आमच्या वीज अधिकारी ९७४८५९६०८४ यांच्याशी त्वरित संपर्क साधा धन्यवाद त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे शाब्दिक वार सध्या सोशल मिडीयावर सुरु झाले आहेत.
याबाबत उरुळी कांचनचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय पोफळे म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट ‘एसएमएस’ना प्रतिसाद देऊ नये. प्रतिसाद दिल्यास संबंधित व्यक्ती हि ॲप डाऊनलोड करण्यास सांगत आहेत. डाऊनलोड केल्याने अनेक नागरिकांचे पैसे खात्यातून काढले गेले आहेत. त्यामुळे सदर मेसेजकडे दुर्लक्ष करावे. वीजबिल भरले आहे. तर असल्या बनावट मेसेजला उत्तर देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.”