पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवेत असलेले पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखरावर भारतासह महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज फडकवला आणि सोलापूर जिल्ह्याचा पहिला एव्हरेस्ट वीर होण्याचा मान पटकावला. त्यात क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने शिवाजी ननवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिवाजी ननवरे यांनी १७ मे २०२३ रोजी एव्हरेस्ट वीर होण्याचा मान पटकावला. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर ध्येय गाठणे कठीण नसते, हेच ननवरे यांनी सिद्ध करून दाखवले. एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोंढेज हे आहे.
ननवरे यांनी एव्हरेस्ट सर केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. त्यात आता सोलापूर विद्यापीठातर्फे क्रीडा दिनाचे औचित्य साधून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र. कलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलपती नियुक्त पूर्व व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, तसेच कुलसचिव योगिनी घारे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सोलापूर विद्यापीठातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या उत्कृष्ट खेळाडूंचा व प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी एव्हरेस्टवीर शिवाजी ननवरे यांनी एव्हरेस्ट मोहिमेबद्दल आपले अनुभव उपस्थित असलेल्या खेळाडू, प्रशिक्षक, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विविध शाखांचे प्रमुख यांना सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे प्रमुख केदारनाथ काळवणे यांनी केले.