पुणे : पुणे रेल्वे स्टेशन हे महत्वाचे रेल्वे स्टेशन असून या स्टेशनशी संबंधित सुविधा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रवाशांना आपल्या सामानाची ने-आन करण्यासाठी लवकरच पुणे रेल्वेस्थानकावर पाच लिफ्ट आणि एक सरकता रॅम्प बसविण्यात येणार असल्याची माहिती पुणे रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिली आहे.
इंदुराणी दुबे यांनी नुकताच पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापकपदाचा पदभार स्वीकारला असून पदभार स्वीकारल्यानंतर दुबे यांनी शुक्रवारी (ता.२) रोजी पत्रकारांशी संवाद साधला.
दुबे पुढे म्हणाले की, पुणे रेल्वेस्थानक परिसरातील अनधिकृत शोरूम हटविणार असून त्याबरोबरीने दुपारच्या वेळेत लोकलच्या फेर्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच पुणे-मुंबईदरम्यान धावणार्या गाड्यांचे डबे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे रेल्वेस्थानकातील पार्किंगचा गोंधळ सोडवताना पार्सल सेवेचा वेग वाढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच, हडपसर टर्मिनलच्या डेव्हलपमेंटसाठी आर्किटेक्टची नेमणूक करण्यात येणार आहे. पुणे-दानापूर गाड्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून पुणे विभागातील १८ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणार आहे. पुणे रेल्वेस्थानकावर ५ लिफ्ट आणि एक रॅम्प बसविणार असल्याची माहिती देखील दुबे यांनी दिली आहे.
यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक ब्रजेशकुमार सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय अभियंता पीयूष चतुर्वेदी, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ रेल्वे सुरक्षा आयुक्त उदयसिंग पवार, पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.