उरुळी कांचन (पुणे) : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.
पुणे शहराच्या चारही बाजूला हवेली तालुक्याचा विस्तार आहे; मात्र इतर बाजूंच्या तुलनेत पूर्व हवेलीतील भौगोलिक रचनेमुळे या भागात विकासकामांसाठी कमी खर्च येतो. तसेच येथील प्रस्तावित विकासकामांमुळे अनेक गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्या या भागामध्ये अनेक भांडवलदार शेतकऱ्यांना भागीदारीत घेवून त्यांच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारणीचे काम जोरात सुरू आहे. गुंतवणुकीचे वाढते प्रमाण व जमिनीचे वाढते बाजारभाव यामुळे या भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे.
दौंड, शिरूर व पुरंदर तालुक्यासह परगावाहून आलेले अनेक कामगार पुणे शहर व परिसरात रोजंदारीसाठी जातात; मात्र पुणे-दौंड रेल्वेमार्ग व पुणे-सोलापूर महामार्ग या सेवांमुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर, दौंड तालुक्यातील केडगाव, यवत व पाटस या गावांमध्ये त्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक आहे.
सध्या पुणे-दौंड रेल्वेमार्गवर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरू आहे. आगामी काळात या रेल्वेमार्गाला उपनगरीय रेल्वेमार्ग घोषित करून विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवा व गाड्यांची वारंवारता वाढविण्यासाठी स्थानिक प्रवासी संघटनांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे या भागामध्ये दिवसेंदिवस नागरिकरणात मोठी वाढ होत आहे.
रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी होणार कमी
प्रस्तावित रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच इतर लहान गावांमध्ये देखील गोडावून, मालधक्के व इतर लहान-मोठ्या व्यवसायांना चालना मिळणार असल्याने सहाजिकच रोजगार निर्मिती देखील वाढणार आहे. नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या सर्वच गावांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, जमिनीच्या खरेदी-विक्रीसारख्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून शासनाच्या महसुलामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. या भागामध्ये नव्याने येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांशी सबंधित सेवांमधून देखील मोठ्या प्रमाणवर रोजगाराची निर्मिती शक्य आहे.
रेल्वेमुळे मिळाली अधिक चालना…
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व परिसरात औद्योगिक वसाहती आहेत. रेल्वेमार्गामुळे येथील विकासाला अधिक चालना मिळत आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादनांमध्येही हा भाग आघाडीवर असल्याने शेतमालासह नाशवंत व कृषी उत्पादने वेगाने पुणे, नाशिकसह मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लवकर पोहचत आहेत.
लोणी काळभोरपर्यंत धावणार मेट्रो
शिवाजीनगर न्यायालय ते लोणी काळभोर दरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्पाचा प्रारूप अहवाल दिल्ली मेट्रोकडून नुकताच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग एलेव्हेटेड असून, त्यासाठी अंदाजे ७ हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. एकूण २१ स्टेशने मार्गावर असणार आहेत.
‘या’ गावांचा विकास जोमात सुरु
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, दौंड तालुक्यातील यवत, बोरींऐंदी, आदी गावांचा विकास जोमाने सुरू आहे.