पुणे : थोर समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यावा. अशी मागणी भाजप हवेली तालुका मोर्चाचे सरचिटणीस योगीराज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.
डॉ. विकास आमटे हे महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेचे सचिव आहेत. डॉ. आमटे यांनी आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा, झरीजामनी, अशोकवन, आणि इतर प्रकल्पाच्या उभारणीत मोठा वाटा व योगदान आहे. बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाच्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप प्रत्यक्ष अमलात आणण्याचा मोठा सहभाग असणारे डॉ. विकास आमटे आहेत.
डॉ. विकास आमटे यांनी हे काम करताना अनेक कठीण परस्थितीत न डगमगता त्यांनी समितीच्या सर्व प्रकल्पाची उभारणी. तसेच हे काम करताना महाराष्ट्र व देशातील तरुण आणि आबालवृद्धांना डॉ. आमटे यांनी जोडले.
डॉ. विकास आमटे यांनी संस्थेवर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना बळ दिले. नर्मदेच्या आंदोलनात बाबा व ताई कित्येक वर्ष तिकडे होते. त्यांच्या पश्चात अत्यंत कल्पकतेने संस्थेला उभारी डॉ. विकास आमटे यांनी दिली आहे. डॉ. विकास आमटे यांनी बाबा व साधांनाताई यांच्या विचारांना पुढे नेणाऱ्या संस्था व व्यक्तींना मानसिक व आर्थिक बळ दिले. अंध, अपंग, निराधार, कुष्टरोगी, आदिवासी! बेरोजगार यांना आत्मिक आनंद देण्याचा बाबा ताई यांचा विचार व आचरण त्यांनी सतत अग्रेसर केले. महारोगी समितीचे सर्व प्रकल्प व त्याला लागणारे जीवन अध्यात्म विकास भाऊ व आमटे परिवार यांच्या नसानसात भिनलेले आहे.
डॉ. विकास आमटे हे २७ ऑक्टोबरला ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. माणसाच्या जीवनात हा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. आपल्या या पंच्याहत्तरीयत मागे वळून पाहताना प्रत्येकाला आपला भूतकाळ स्मरतो आणि भविष्यकाळ वेध असतो. वर्तमान काळात आपण सर्वांनी त्यांचा यथोचीत सत्कार व गौरव केला पाहिजे असे आम्हास वाटते व आपणही हा सन्मान देऊन या पुरस्काराची उंची वाढवावी. अशी मागणी योगीराज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप नेते प्रदीप कंद , रोहिदास उंद्रे, दादासाहेब सातव पाटील,संदीप भोंडवे, रवींद्र कंद, भेरवी पलांडे यांच्यामार्गदर्शनाखाली योगीराज शिंदे हे हवेली तालुक्यात काम करतात.