धुळे : धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल राजभवनात राष्ट्रपती पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मिळाल्याने धुळेकर जनता आनंदित झाली आहे. प्रवीण कुमार पाटील यांच्या कारकिर्दिवर धुळेकर आधीच खूष आहेत. खुद्द जनते मधून अशा खुशीचा बहुमान फार थोड्या अधिकार्यांच्या नशिबी असतो.
पूर्वी पासूनच व बर्याचदा भ्रष्ट्राचार – धार्मिक तणाव व अशाच बहुतेक नकारात्मक बाबींसाठी धुळे जिल्हा राज्यभरात गेली काही वर्षे ओळखला जात होता. अवैध गुटखा , अवैध व बनावट दारू ,अंमली पदार्थ, गावठी अवैध पिस्टल , तलवारी, गँगवार, चोरीच्या मोटार सायकली – ट्रक ची विल्हेवाट , अवैध सावकारी , भुमाफियागिरी व अशाच कितीतरी प्रकारांनी हा जिल्हा गाजत होता. पूर्वी क्राईम चार्ट मध्ये दाखल गुन्ह्यांची घटलेली संख्या दाखविण्याच्या नादात गुन्हेच दाखल केले जात नसत.
गुन्हे दाखल करावयास आलेल्या नागरिकांना एकतर फिर फिर करावयास लावून वैताग आणावयाचा किंवा गोर गरीब तक्रारदारास पिटाळून लावायचे, ही कार्य पद्धती तेव्हा वापरली जात असे. बऱ्याचदा प्राथमिक चौकशीच्या नावावर असंबद्ध कागदपत्रे गोळा करावयास लावून तक्रारदारास खूप फिरवून गोंधळात टाकावयाचे व त्याने नाद सोडला म्हणून शेरा मारून नस्ती दप्तरी करून निर्गती करून टाकावयाची. ही पद्धत राज्यभरात पोलिस दलात सर्वत्र वापरली जाते.
पूर्वी थोड्या फार फरकाने धुळ्यातही हेच सुरु होते. मात्र प्रवीण कुमार पाटील हे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आले. त्यांनी आल्या आल्या अवैध सावकारी – भु माफियागिरी आणि गुटखा – अंमली पदार्थ विरोधी कठोर मोहिमेचे सुतोवाच केले होते. त्यानुसार त्यांनी राज्यभरातच पोलिस दल व जनतेत प्रचंड गाजलेल्या अवैध सावकारी विरोधातील मोहिम धुळ्यात यशस्वी केली. या मोहिमेचा पोलिस दलात अभ्यास व्हावा. या विषयातला हा पायलट प्रोजेक्ट ठरावा, अशा प्रकारे ही मोहिम यशस्वी करण्यात आली.
धुळे जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश हद्दीवरील जिल्हा आहे. राज्यभरात वितरणासाठी धुळे जिल्हा मार्गे लगतच्या राज्यातून प्रचंड प्रमाणावर अवैध गुटखा, विविध अंमली पदार्थ, अवैध व बनावट दारू येते. मध्य प्रदेशमधुन अवैध रिवाल्व्हर – पिस्टल – हत्यारे येतात. ही बाब हेरून कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर धुळे जिल्हा पोलिस दलाने या सर्वांविरोधात मोठीच मोहिम राबविली. आणि ती देखील यशस्वी केली. वार्षिक क्राईम चार्टला दाखल गुन्ह्यांची संख्या वाढेल याचा विचार न करता ‘ गुन्हेगारीवर वचक ‘ बसविण्यासाठी आवश्यक असलेली ही मोहिम राबविण्यात आली.
दरम्यान, खून – चोऱ्या – रस्ता लूट – वाहन चोरी – आर्थिक फसवणूकीचे कितीतरी गुन्हे त्यांच्या लॉजिकल एन्ड पर्यंत त्यांच्या कार्यकाळात गेले. अर्थात त्यांना त्यांच्या एल सी बी, आर्थिक गुन्हे शाखा व विविध वरीष्ठ अधिकारी प्रभारी अधिकार्यांचे चांगले सहकार्य मिळाले. ” लिडर चांगला असेल – पाठिशी खंबिरपणे उभा राहणारा असेल – मोटिव्हेशनल असेल तर त्याची टीम देखील तेवढ्याच ताकदिने व डिव्होशनने सोबत उभी राहते, ” असे नेहमी म्हटले जाते.
ही बाब धुळे जिल्ह्यात डी. एस. पी. प्रवीण पाटील यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष बघावयास मिळाली. त्यामुळे त्यांच्या सोबतच त्यांच्या सर्व टिमचेही धुळेकरांनी अभिनंदन केले पाहिजे. खरे म्हणजे अलीकडे कोणत्याही प्रशासकीय यंत्रणे बाबत बहुदा टीकात्मकच लिहावे लागण्याची परीस्थिती असते. रणरणत्या वाळवंटात एखादी पाणथळ हिरवाई पाहिल्यावर जे समाधान मिळते, तसे समाधान क्वचितच कोणत्याही प्रशासकीय यंत्रणे बाबत मिळत असते. असे दुर्मिळ समाधान डीएसपी प्रवीण कुमार पाटलांच्या या गौरवामुळे धुळेकरांना मिळाले आहे. त्यांचे धुळेकरांच्या वतीने अभिनंदन !