बारामती,(पुणे) : बारामतीत आज नमो महारोजागर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे. या मेळाव्यामुळे राज्यातील सर्वच दिग्गज नेते आज बारामतीत एकत्र आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बारामतीत ५५ हजार तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून रोजगार घेणारे आणि रोजगार देणाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम या मेळाव्यातून करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने प.महाराष्ट्रातील हा मेळावा बारामतीत होत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच गृहमंत्री पद मी तुम्हाला देणार नाही, पण गृह खात्यासाठी तुमची मदत नक्कीच घेईल, असही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
तसेच पुढे बोलताना म्हणाले, अजित पवारांनी नमो रोजगार मेळाव्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मेळाव्यासह बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस आयुक्तांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. याचा उल्लेख करत अजित पवारांच्या नेतृत्त्वात बारामतीमधील बस स्थानक हे एखाद्या विमानतळासारखं वाटावं, एवढं सुंदर व सुसज्ज आहे. बारामतीमधील पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कार्यालय किंवा पोलिसांच्या क्वार्टर्सच्या इमारती पाहिल्यावर हे सरकारी बांधकाम आहे, असं वाटतच नाही. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचं असावं एवढं सुंदर कार्यालय अजित दादांनी बारामतीकरांना दिलं आहे, असे फडणवीस म्हणाले.
तुमची मदत ह्या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चित घेईल
दादा मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की, तुम्ही स्वत: लक्ष घालून एवढ्या चांगल्या इमारती बांधल्या, मला आता मोह होत आहे की, आपल्या पोलीस विभागाच्या जेवढ्या इमारती आहेत, तिथं पीएमसी म्हणून तुम्हालाच नियुक्त करावं. म्हणजे सगळ्या इमारती चांगल्या होतील. अर्थात, दादा मला हळूच म्हणू शकतील की पीएमसी कशाला, खातंच माझ्याकडे द्या. पण, दादांना खातं देणार नाही, ते माझ्याकडेच ठेवेन. मात्र, तुमची मदत ह्या चांगल्या इमारती बांधण्याकरिता निश्चित घेईल, असे फडणवीसांनी थेट बारामतीच्या मंचावरुन म्हटले आहे.