अजित जगताप
सातारा : मराठी साहित्य क्षेत्रात करिअर न करता दीन दलित समाज्याच्या कष्टकरी व दुःखाला प्रतिष्ठा मिळवून देणारे थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देण्याची मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती दलित सेना प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप-सायगावकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे व मान्यवरांनी दिली आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनकाळात जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले. अन्नाभाऊंच्या साहित्यात समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. वैजयंता, फकिरा ही कादंबरी नसून प्रेरणादायी ऐतिहासिक वारसा जपला आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले होते.बौद्ध, मातंग व चर्मकार व इतर मागासवर्गीय समाज्याचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेरणा स्थान आहे.जग बदलुनी घाव, सांगून गेले आम्हा भिमराव,, अशा शब्दात वर्णन करून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे.
“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली”हे काव्य म्हणजे आज ही गावकुसाबाहेरील कुटूंबाची व्यथा मांडली आहे. अण्णाभाऊंनी मुंबईचे वर्णन करताना ,“मुंबईत उंचावरी, मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती परळात राहणारे,रात दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गळती” मुंबई नागरी ग बडी बाका जशी रावणाची लंका,, असे लिहिले होते. ते आज ही प्रकर्षाने जाणवते.
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ यांचा दि १ऑगस्ट १९२० रोजी जन्म झाला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व समाज व लोकप्रतिनिधी येत आहेत. त्यांचे स्वागत आहे परंतु, त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने शिफारस करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रमेश अनिल उबाळे, रिपब्लिकन पक्षाचे प्रतिक गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे तुषार बैले यांनी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न ‘किताब देऊन त्यांचा यतोचित सन्मान करण्यात यावा असे सूचित केले आहे.