कोपरगाव : अहमदनगर मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. घराशेजारी मुलांचा पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी धावताना दम लागल्याने श्वास बंद झाला. यामुळे सातवीत शिकणाऱ्या मुलाचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनवडी येथे घडली आहे.
या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.साहिल भाऊसाहेब गांगुर्डे असं दुर्दैवी मृत झालेल्या मुलाचं नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आठवडा बाजार असल्याने आई- वडिलांनी साहिलसाठी मिठाई आणली होती. शाळा सुटल्यानंतर साहिल नेहमीप्रमाणे घरी आला आणि त्याने मिठाई खाल्ली.
त्याचवेळी घराशेजारीच पतंग उडवणाऱ्या मुलांचा पतंग कट झाल्याने तो पतंग पकडण्यासाठी साहिल जोर जोरात धावला. तुटलेला पतंग त्याने पकडला, मात्र खूप जोरात धावल्याने त्याला धाप लागून त्याचा श्वास थांबला आणि तो अत्यव्यस्त झाला.
वडील भाऊसाहेब गांगुर्डे आणि आई सोनाली गांगुर्डे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ साहिलला गावातील खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला कोपरगाव येथे दाखल करण्यास सांगितलं.
कोपरगाव येथील रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी अतिशय धावल्याने त्याचा श्वासोश्वास बंद झाल्याने त्याला मृत घोषित केले.
मृत साहिल हा सोनेवाडी येथे जि. प. प्राथ. शाळेत इ. ७ वीमध्ये शिक्षण घेत होता. 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा दम लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.