उरुळी कांचन, (पुणे) : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात बुधवारी (ता. ०७) दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त विविध ठिकाणच्या मंदिरामध्ये आकर्षक फुलांची, पताका व फुग्यांची सजावट करून विद्युत रोषणाई करीत दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कदमवाकवस्ती येथे दत्त मंदिर व पीर येथे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजता काकडा आरती, सकाळी सहा वाजता महाअभिषेक, आठ वाजता श्री दत्त गायश्री व स्वामी गायत्री यज्ञ पार पडला.
उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्र येथे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार मेश्राम, पोलीस अंमलदार राजेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत देवाची आरती करण्यात आली. तसेच सदर ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त जयंतीचे नियोजन बाळासाहेब घाडगी यांनी केले होते.
श्री गुरुदत्त सेवा विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन आयोजित तुपे वस्ती येथे दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्तजन्म सोहळा होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हभप अक्षय कुमार रोडे महाराज यांचे या ठिकाणी सुश्राव्य कीर्तन झाले यावेळी गुरुदत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील तुपे, उपाध्यक्ष बाळासाहेब तुपे, मनोज ताम्हाणे, राजु भोसले शंकर भालेराव, रोहन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कस्तुरी मंगल कार्यालयाच्या महिलांनी पाळणा म्हणत दत्त जन्म सोहळा साजरा केला. या वेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कोरेगाव मूळ येथे आदर्श सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बोधे काकडेवस्ती येथे दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या वेळी भजन, कीर्तन, महाप्रसाद, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दरम्यान, दिवसभरात भजन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलावर्गाने दत्तजन्म सोहळ्यानिमित्त एकत्रित येऊन पाळणा, नाव ठेवणे असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले