पुणे : पीक योजनेचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याचा वाद ताजा असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
सत्तार म्हणाले, शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागत असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्यांना मिळणारी भरपाई अतिशय कमी असते. सध्याच्या विमा रकमेत शेतकऱ्यांचा वाटा दोन टक्के आहे. उर्वरित ५० टक्के केंद्र आणि ५० टक्के राज्य सरकार भरते. राज्याचा हिस्सा उचलण्यास आम्ही तयार असून केंद्राने त्यांचा हिस्सा दिल्यास ही योजना लागू होऊ शकते. शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया, सातबारा द्यावा, असा आमचा प्रस्ताव आहे.
राज्यात ९६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता राज्यात १ कोटी ५३ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी पीक विमा काढणाऱ्यांची संख्या ९६ लाख इतकी आहे. पीक विमा एक रुपयात केल्यास ९६ लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.
पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना दोन टक्के रक्कम भरावी लागते. अनेकदा शेतकरी ही रक्कम भरू शकत नसल्याने पीक विमा काढू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा मिळावा असा प्रस्ताव तयार केला असून केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पुण्यातील बैठकीत तो सादर करण्यात येईल, अशी माहिती सत्तार यांनी दिली.