Crime News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात आर्थिक कारणातून मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काचेचा ग्लास तोंडावर मारल्याने एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या चेहऱ्यावर 60 टाके पडले आहेत. ही घटना 15 डिसेंबर रोजी बीड बायपास परिसरातील ‘चूल आंगण’ या हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुण्यातील धक्कादायक प्रकार! ‘चल आपण खेळू’ म्हणत झाडीत नेलं अन् अल्पवयीन मुलासोबत केलं भयंकर कृत्य…

अमोल कल्याणकर नवथर वय 35, रा. बीड बायपास असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात योगेश खरात, आदित्य कोल्हे, श्याम पोपळघट यांच्यासह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली त्या वेळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील एक पोलीस अंमलदार हॉटेलमध्ये उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल नवथर हे त्यांच्या मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी योगेश खरात याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर योगेशने फोन करून आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच चार ते पाच जण एकत्र येत नवथर यांच्यावर हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात काचेच्या ग्लासने वार केल्यामुळे नवथर यांच्या चेहरा आणि कपाळावर गंभीर जखमा झाल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर 60 टाके पडले असून तब्बल 4 दिवसांनंतर त्यांना शुद्ध आली.
शुद्धीवर आल्यानंतर नवथर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. उपनिरीक्षक रेशीम कोळेकर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, बीड बायपास परिसरात अवैध हॉटेल, ढाबे आणि दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. देवळाई चौक ते झाल्टा फाटा दरम्यान अनेक हॉटेल्स आणि बार असून रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री सुरू असते. त्यामुळे या भागात गुन्हेगारी वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.







