Congress strategy : नवी दिल्ली : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या रणनीतीकारची संस्था मदतीला होती, त्याच संस्थेने तेलंगणासाठी काम केलं. त्यामुळे तेलंगणात सत्तापरिवर्तन झाले आहे. काँग्रेसने तेलंगणात अभूतपूर्व यश मिळवले आहे. सत्ताधारी बीआरएस पक्षाला धोबीपछाड करत काँग्रेसने तेलंगणात सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसने कर्नाटकातही सत्ताधारी भाजपाला धुळ चारत सत्ता स्थापन केली होती. या दोन्ही यशात एका गोष्टीत साम्य आहे, ते म्हणजे निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू.
“तेलंगणात आम्हाला मोकळ्या हातांनी काम करता आले. आम्ही अंतर्गत सर्वेक्षण केले आणि त्यानुसार काम केले. त्यामुळे पक्षातील नेत्यांचा विजयात हातभार लागला नाही, असे म्हणता येणार नाही. त्यांनी नेहमी आमचं ऐकलं आणि आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिले”, कानुगोलू फर्मच्या वरिष्ठ सदस्याने सांगितले.
कानुगोलू फर्मच्या वरिष्ठ सदस्याने मीडिया बाईटमध्ये सांगितले की, कानुगोलूच्या टीमने, राजस्थान निवडणुकीपूर्वी एक मूल्यांकन केले होते. त्यानुसार, जिंकण्याची शक्यता कमी किंवा अगदीच नाही अशा उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. अंतर्गत सर्वेक्षण हे तेलंगणातील यशामागे मुख्य कारण आहे. यात पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाचा किंवा पक्षाचा हस्तक्षेप नव्हता. तसेच पक्षपाती अहवाल पक्षाच्या बाजूने देण्याचा दबावही नव्हता. जर ग्राउंड रिअॅलिटीने खडतर लढा सुचवला असेल तर आम्हाला हे स्पष्टपणे पक्षाला सांगण्याचे स्वातंत्र्य होते. यामुळे विधायक चर्चा घडवून आणण्यास मदत झाली”, असं ते म्हणाले.