सुरेश घाडगे
परंडा : शाळेतील मुलांना एक सकारात्मक संदेश देण्यासाठी रविवारी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या अनुषंगाने जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा आशा मोरजकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावर येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट येथे शुक्रवार ( दि .८ ) निरूपण करून मुलामुलींना मार्गदर्शन केले .
”ओले मूळ भेदी खडकाचें अंग ।
अभ्यासासी संग कार्यसिध्दी
नव्हे ऐसें काही नाहीं अवघड ।
नाहीं कईवाड तोंच वरी ।
दोरें चिरा कापे पडिला कांचणी ।
अभ्यासें सेवनीं विष पडे ।
तुका म्हणे कैचा बैसण्यासी ठाव ।
जठरी बाळा वाव एकाएकीं I”
संत तुकाराम महाराजांच्या या मूळ अभंगावर मोरजकर यांनी मार्गदर्शन केले . ते म्हणतात की, वृक्षाचे ओले मूळ खडकाचे कठीण अंग भेदून पुढे सरकते. दोऱ्याने दगडावर नित्य घर्षण केल्यास दगड कापला जाऊ शकतो. विष पचायला अत्यंत कठीण असते, पण हेच विष सातत्याने थोडे थोडे घेतले तर तेही पचविणे शक्य होते. मातेच्या उदरात जन्माच्या वेळी बाळाचा आकार मावेल एवढी जागा नसतानाही हे जन्म घेणारे बाळ आपल्या गरजेनुसार हळूहळू जागा निर्माण करीत जाते.
ओल्या मूळाचे खडक भेदणे, दोऱ्याने दगड कापणे, सरावाने विष पचणे या साऱ्या गोष्टी अभ्यासाने, सातत्याने आणि प्रयत्नांनी शक्य होऊ शकते. म्हणजे अशक्य काहीच नाही! राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची उदाहरणे देऊन मुलांना प्रेरीत केले. आज आपल्याला तलवारीची लढाई नाही तर विचारांची लढाई करायची आहे आणि म्हणून आज संत तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील फरक आजच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. तसेच समाज बदलासाठी असेच सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे . असे मोरजकर यांनी मार्गदर्शन केले .