पुणे : बेकायदेशिररीत्या विक्रीसाठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी महाविद्यालयीन तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन बापू बेलदरे (१९, रा. आई श्री व्हिला अपार्टमेंट, आंबेगाव) असे या तरुणाचे नाव आहे. आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका गोरे व तपास पथक दत्तनगर परिसरात गस्त घालत होते.
त्यावेळी पोलिस कर्मचारी धनाजी धोत्रे आणि नीलेश जमदाडे यांना माहिती मिळाली की, आई श्री व्हिला अपार्टमेंटच्या बाजूला गाईच्या गोठ्यामध्ये एका जणाकडे पिस्तूल आहे. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिस पथक तेथे गेले, त्यांनी तेथे असलेल्या आर्यन बेलदरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार १०० रुपयांचे पिस्तूल व जिवंत काडतूस मिळाले.
विक्री करण्याच्या दृष्टीने त्याने ते बाळगले होते. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलिस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, नीलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे आणि विनायक पाडळे यांच्या पथकाने केली.