पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत आहेत. दस्त नोंदणीसाठी करण्यासाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, पुण्यातील काही दस्त नोंदणी कार्यालयांतील असुविधांमुळे मालमत्ता खरेदी-विक्री करणारे नागरिक हैराण झाले आहेत.
वस्तू व सेवा करानंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. राज्याच्या तिजोरीत पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जातो. मात्र, शहरातील अपवाद वगळता बहुतांश कार्यालयांत दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, चांगली स्वच्छतागृहे, बसण्यासाठी जागा अशा सुविधा नाहीत. या असुविधांमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस संघटनेचे अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले की, पुणे शहरात २८ दस्त नोंदणी कार्यालये आहेत. मात्र शहरातील काही दस्त नोंदणी कार्यालयांतील दुय्यम निबंधक सुट्या घेतात. अतिरिक्त दुय्यम निबंधक उपलब्ध नसल्याचे असे सहजिल्हा निबंधकांकडून सांगितले जाते. परंतु, पुण्यातील काही दस्त नोंदणी कार्यालयांत स्वच्छतागृहांची व्यवस्था नाही. आतापर्यंत नोंदणी महानिरीक्षक, सहजिल्हा निबंधक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार करूनही फरक पडलेला नाही.