यवत : यवत स्टेशनरोड परिसरातील मेहेर ट्रेडिंग कंपनी या पशुखाद्य दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील ड्रॉवरमधील तब्बल 65 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुकानाचे मालक शेषमल रतनचंद मेहेर (वय 67) यांनी 14 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते. दुकानाच्या शटरला बाहेरून कुलूप लावून ते घरी गेले. मात्र, घाईगडबडीत दुकानाच्या ड्रॉवरमध्ये व्यवसायाची 65 हजार रुपयांची रोकड राहून गेली होती.

दुसऱ्या दिवशी, 15 सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मेहेर दुकान उघडण्यासाठी गेले असता शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानात प्रवेश करून पाहणी केली असता ड्रॉवर उघडा दिसला. त्यातील रोकड गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानात शोध घेतला; मात्र पैसे मिळून आले नाहीत.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील रोकड चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या रकमेत 500, 200, 100 आणि 50 रुपयांच्या नोटांसह सुमारे 1हजार 950 रुपयांची चिल्लर असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार खोमणे करीत आहेत.







