पुणे : वाघोली परिसरातील बहुतांश गणेश मंडळांचे नवव्या दिवशी विसर्जन होणार असल्याने पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने वाघोली परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

ही वाहतूक व्यवस्था 22 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 23 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका तसेच अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

पुण्यातून नगर रोडमार्गे छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि शिर्डीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बस, कामगार बस आणि जड वाहनांनी सदलबाबा चौक, चंद्रमा चौक, विश्रांतवाडी, आळंदी आणि शिक्रापूर या मार्गाचा वापर करावा. नगर रोडमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसने शिक्रापूर, चाकण आणि मुंबई या मार्गाने जावे.

नगर रोडमार्गे पुणे शहरात येणाऱ्या बससाठी लोणीकंद येथून थेऊर फाटा, केसनंद गाव, थेऊर आणि सोलापूर रोड हा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या हलक्या चारचाकी वाहनांनी थेऊर फाटा, लोणीकंद गाव, केसनंद, थेऊर गाव, थेऊर फाटा आणि सोलापूर रोड या मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी जावे. तर पुण्याकडून शिरूर आणि अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वाघेश्वर चौकातून डावीकडे वळून भावडी गावामार्गे पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सुरभी माथा, लोणीकंद येथे पोहोचावे. त्यानंतर पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, तसेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हा वाहतूक बदलाचा आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी जारी केला आहे.






