पुणे : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये काम करत असणाऱ्या एका डॉक्टरच्या मोबाईलवर हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मेसेजद्वारे आल्याने खळबळ उडाली. या धमकीची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या धमकीची गंभीरपणे दखल घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला असता रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की,अरविंद कृष्णा कोकणी (वय 29) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे.आरोपीने धमकी देण्यासाठी ससून रुग्णालयातील एका महिला रुग्णाचा मोबाईल चोरला होता. त्याने त्या मोबाईलवरुन एका डॉक्टरला रुग्णालयात बॉम्ब असल्याची धमकी देणारा मेसेज केला. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. दुसऱ्या दिवशी त्याने मोबाईल सुरु केला आणि थेट रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचा मेसेज केला. त्यानंतर त्याने परत मोबाईल बंद केला. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याने असं नेमकं का केलं? याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
दरम्यान याप्रकरणी आरोपीला येरवडा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. आरोपी सुरुवातीला आपला गुन्हा कबूल करत नव्हता. पण पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला.