खेड : भीमाशंकर दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या दूध संकलन केंद्रावर दूध उत्पादक शेतकरी बांधवांबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) शरद बुट्टे पाटील यांनी संवाद साधला. पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या या शेतकऱ्यांना यावेळी काही सूचना देखील केल्या. केंद्र आणि राज्याच्या शेतकऱ्यासंबंधीच्या योजनांची यावेळी शेतकऱ्यांना माहिती दिली.
बूथ समितीच्या कार्यकर्त्यांबरोबर अल्पोपहार घेऊन बूथमध्ये राहिलेल्या काही रचनेबद्दल कार्यकर्त्यांना सूचना केल्या. तसेच BLA 2 चे फॉर्म भरून घेतले. याचवेळी माजी सभापती ज्येष्ठ नेते काळूराम सुपे यांची देखील भेट घेऊन त्यांना ‘गाव चलो अभियाना’ची माहिती देण्यात आली. पोस्ट ऑफिसमध्ये रविवारी जाऊन ज्या लोकांना योजनेसंबंधी काही अडचणी सांगितल्या होत्या, त्याबाबत पोस्टमास्तर यांच्यासोबत चर्चा करून लोकांच्या मनातील गैसमज दूर केले.
स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी केंद्र सरकारच्या पोस्टाच्या माध्यमातून राबिण्यात येत असलेल्या, योजनांची माहिती उपलब्ध करून दिली. याशिवाय, पावडेवाडी येथे रमेश पावडे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन करून येथील कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला.
ग्रामपंचायत कार्यालय वाडा या ठिकाणी गावचे सरपंच, सदस्य ग्रामविकास अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधून, केंद्र सरकारने निधी दिलेल्या वित्त आयोग निधीसह, विविध योजनांबद्दल चर्चा केली. राज्य आणि स्थानिक पातळीवरचे देखील काही योजनांची माहिती देऊन केंद्राच्या योजनांच्या कामाचे पत्रक सर्वांना दिले.
विविध योजनांची दिली माहिती
गावातील ४० हून अधिक महिला बचत गटाचे अध्यक्ष, सीआरपी, आशा वर्कर यांच्याशी संवाद साधून त्यांचा एकत्रितपणे सन्मान केला. तसेच पंतप्रधान मोदींनी कायदे मंडळात दिलेले महिला आरक्षण यासह, केंद्राचे महिला हिताचे विविध योजनांची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधून केंद्र सरकारच्या मातृवंदना योजनेचा आढावा घेतला.
वाडा गावातील प्रश्न मार्गी लावणार
नागरिकांनी मांडलेल्या काही तक्रारी आणि सूचना यावर निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नक्कीच प्रयत्न करणार असून, पुन्हा पुढील कालावधीमध्ये वाडा गावात प्रवास करून इथले काही प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही बुट्टे पाटील यांनी सांगितले.