कोल्हापूर : कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलाने मंगळवारी (22 एप्रिल )जाहीर झालेल्या यूपीएससीच्या निकालात 551 रँक पटकावून आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.बिरदेव सिद्धापा डोणे असं त्याचं नाव आहे. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर बिरदेव हे बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेले होते. निकाल जाहीर झाल्याची बातमी यमगे गावात पोहोचताच गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोराने मिळवलेल्या लख्ख यशात उजळून निघाला.
बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे. शाळेत असल्यापासूनच आयपीएस व्हायची इच्छा, त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही खचला नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551 व्या क्रमांकाने यश मिळवलं. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे यश मिळवलं आहे. बिरदेव डोणेला भारतीय पोलिस सेवा म्हणजे आयपीएस सेवेत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे. विशेष म्हणजे कागल तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी होण्याचा विक्रम आता बिरदेव यांच्या नावावर असणार आहे.
बिरदेव यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले.त्यांचं बालपण डोंगरदऱ्यामध्ये मेंढ्या चारत,कधी उघड्यावर अभ्यास करत तर कधी पोटासाठी झगडत गेले. त्यांनी गावातच प्राथमिक,माध्यमिक शिक्षण पूर्ण केले असून दहावीत 96% गुण मिळवले.तेव्हा त्यांचा मुरगूड केंद्रात पहिला क्रमांक आला होता. त्यावेळी त्याचा सत्कार देखील करण्यात आला होता तेव्हा त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न असल्याच सांगितले होते.आता त्यांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे. वडील मेंढपाळ असून घरात कोणतीही सुविधा नसताना बिरदेव यांनी मिळवलेल्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे.