अहमदनगर : राज्यामध्ये सद्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. विधानसभेच्या जागा वाटपासाठी बैठका त्यावर चर्चा सूरु झाल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. २९ सप्टेंबर) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात खर्डा येथील शिवपट्टण किल्ला जतन व संवर्धन, वखार महामंडळ गोदाम बांधकाम, खर्डा जामखेड रस्ते कामाचे उद्घाटन शरद पवार तसेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा किस्सा सांगताना रोहित पवारांबाबत एक महत्वाचे विधान केले आहे.
“मी कधी मंत्री झालो नाही, पदाची अपेक्षा केली नाही. रोहितनेही कधी पक्षाकडे पदाची अपेक्षा केली नाही. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो, पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा, आणि नंतर वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो, एकदा नाही चार वेळा मुख्यमंत्री झालो, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
रोहितची पहिली पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी..
रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आहेत, त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असणार. आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची असणारा आहे. असे सूचक विधान शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांनी केलेले हे विधान म्हणजे रोहित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची तयारी होत नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.