शिर्डी : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असताना, शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरात जाताना आता कोणत्याही भाविकाला फुल,हार किंवा प्रसाद घेऊन मंदिरात प्रवेश करता येणार नाही. ही बंदी आजपासून (11 मे ) अंमलात आणली आहे.
सकाळपासून शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस, एम एसएफ, क्यूआरटी अशा विविध सुरक्षा एजन्सीचे तब्बल एक हजाराहून अधिक सुरक्षारक्षक साई मंदिराचे सुरक्षा पाहत आहेत. भारत पाकिस्तान पार्श्वभूमीवर मंदिरात पुन्हा हार, फुले, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात येणार असल्याने हार प्रसाद व्यावसायिकांना याचा फटका बसणार आहे.
साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची व्यक्तिगत तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय, फुलं-प्रसाद हे मंदिराच्या प्रवेशद्वावर सुरक्षा रक्षकांकडून जप्त करण्यात येत आहे. भाविकांनी काहीशी नाराजी व्यक्त केली असली तरी साई संस्थान प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांकडून समजूत काढली जात आहे. साई मंदिरात हार प्रसाद घेऊन जाण्यास आणखी किती वेळ बंदी असेल याची माहिती संस्थानाकडून देण्यात आली नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेल्या निर्णयाला भाविकांना प्रतिसाद द्यावा असे आवाहन साई संस्थानाकडून करण्यात आले आहे.