बीड : देशात महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. त्याविरोधात देशभरात आंदोलनं सुद्धा सुरु आहेत. मात्र, अजूनही महिलांविरोधात घडणारे गुन्हे कमी होत नाही आहे. अशातच आता बीडमध्ये 11 वर्षीय मुलीवर मौलाना तीन महिन्यापासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमावर पेठ बीड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रियाज शेख असे आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा भागात राहणारा मौलाना रियाज शेख हा त्याच्या राहत्या घरी उर्दु आणि अरबी भाषा शिकवणी घेत होता. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकवणीची वेळ वेगवेगळी होती. याचाच गैरफायदा घेत आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून 11 वर्षाच्या मुलीवर नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचेही म्हटले आहे. पत्नी आणि मुले घरी नसताना त्याने हे दुष्कर्म केले असल्याचे आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, मुलीने आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आई- वडिलांनी तात्काळ पेट बीड पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. पेठ बीड पोलीस ठाण्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.